…तोवर राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही – अजित पवार

अजित पवार

मुंबई – विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

एकीकडे वाढीव वीजबिल आणि वीज खंडित करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोवर वीजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोवर राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत दिली आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला होता.तत्पूर्वी वीजदरवाढीविरोधात भाजप आमदार राम सातपुते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अंगावर बल्ब, वीजपंप लावून सातपुते यांनी विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. तर याविषयावर सातपुते यांनी ‘वीज दरवाढ कमी केली नाही तर वीजपंप सरकारच्या डोक्यात घालू’ असा गंभीर इशारा सरकारला दिला आहे.

दरम्यान, यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.

महत्वाच्या बातम्या –