एका मिरची व्यापाऱ्याने चक्क जयंत पाटील यांना फसवले!

जयंत पाटील

सांगली – सांगलीतील एका व्यापाऱ्याने चक्क राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द पाटील यांनीच ही माहिती दिली. आपल्याला २ ते ३ लाख रुपयांना फसवण्यात आलं होतं असे ते म्हणाले.

जयंत पाटील हे आज सांगलीत आहेत. जयंत पाटील यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर अंतर्गत आष्टा उपबाजार आवारात केळीच्या सौद्याचा शुभारंभ केला. याआधी त्यांनी हळद खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सांगलीत पर्याय होता. त्यानंतर आता केळीच्या व्यवहारासाठीही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्याबाबतीत घडलेला एक अनोखा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘मी १९९२ ते १९९३ साली शेती केली होती. त्यावेळी मी लाल, हिरवी, पिवळी सिमला मिरचीचे उत्पादन घेतले होते. सुरुवातीला मला दोन ते तीन महिने चांगले पैसे मिळाले. आपण चांगली शेती करू, असे मला वाटले होते. पण नंतर व्यापाऱ्याने माल खराब आहे, असे सांगितले. त्यामुळे तो व्यापारी कमी पैसे देऊ लागला. यामुळे मी २ ते ३ लाखांना फसलो.’

दरम्यान, सांगली महानगरपालिकेत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जयंत पाटील यांच्या या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रेड कार्पेट, गालिचा, भव्य स्तंभ आणि ढोल ताशांच्या कडकडाटात फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या काळात नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांची चेंगराचेंगरी, गर्दीचा महापूर यावेळी पाहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या –