कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात कडक निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे

मुंबई – गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर राज्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या बंगल्यावरून बैठकीला उपस्थित आहेत. अधिवेशनानंतर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १० मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि ग्रामीण भागा प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात गेल्या काही दिवसात सरासरी ५०० रुग्ण आढळले आहेत. शहरात काल म्हणजेच ७ तारखेला ६२९ रुग्ण, ६ तारखेला ५७३ रुग्ण, ५ तारखेला ६०२ रुग्ण, ४ तारखेला ५०२ रुग्ण तर ३ तारखेला ४८३ रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी नियमांच योग्य पालन केलं नाही तर कठोर पाऊल उचलण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

नागपुरातही कोरोना कहर सुरूच आहे. आज नागपुरात १२७६ नवीन रुग्ण वाढले आहेत. ज्यामध्ये शहरात १०३७ तर ग्रामीणमधील २३६ रुग्णांचा समावेश आहे. आज नागपुरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय, अशी भीती सर्वसामान्यांना वाटते आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी ही आज राज्यात जेथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –