पाण्याचे मोल जाणा आणि अपव्यय टाळा – संजय बनसोडे

संजय बनसोडे

मुंबई – पाणी हे जीवन असून मानवाच्या आयुष्यात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी पाण्याचे मोल जाणून पाण्याचा अपव्यय टाळूया, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.युनायटेड नेशन ही संस्था जागतिक जल दिनाचे आयोजन करीत असते. त्यासाठी प्रतिवर्षी एक नवीन संकल्पना मांडली जाते. यावर्षीची संकल्पना ‘पाण्याचे मोल’ ही असून प्रत्येकाने पाण्याचे मोल जाणून घेऊन त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन आणि वापर करणे अपेक्षित आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुरळीत पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असून त्यासाठी पाणीपुरवठा  व स्वच्छता विभाग नेहमीच कार्यशील राहिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी उपलब्धतेसाठी विविध कार्यक्रम, योजना राबविल्या जात असून महाराष्ट्रातील जनतेनेही या कामी शासनास सहकार्य करावे. आपण सर्वांनी आपापल्या परीने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आजच्या या जलदिनी आपण सारे मिळून पाणी बचतीचा संकल्प करुया आणि आपला महाराष्ट्र जलसमृध्द करुया.

पाणी अनमोल संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करणे हे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पाण्याची गळती अथवा चोरी, अनधिकृत नळजोड, भूजलाचा अत्याधिक उपसा, पाण्याचे प्रदूषण या गोष्टींवरही नियंत्रण राखणे तितकेच गरजेचे असल्याचे राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –