पुणे – पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. काल ( २५ मार्च ) पुणे शहरात तब्बल ३ हजार २८६ रुग्णांची भर पडली आहे. तर पुणे जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ७१० झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६ हजार ४३२ नवीन रुग्णांचा समावेश आहे.
पुण्यातील याच कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला पाहता पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिकांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, दोन्ही पालिकांचे आयुक्त, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर अजित पवार यांनी तूर्तास पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळले नाही तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. तर ३१ मार्च पर्यंत बंद असलेल्या शाळा आता ३१ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचा विचार असल्याचे सांगत अजित पवारांनी खासगी रुग्णालयात ५० टक्के बेड ताब्यात घेणार आहोत असे देखील सांगितले. तर यावेळी लोकप्रतिनिधींना सर्वच खाजगी कार्यक्रम पूर्ण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, रात्रीची संचारबंदी आहे तशीच राहणार आहे. सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी सुरु राहणार असून मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –