मोठी बातमी – महावितरणे तब्बल ३० हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन केली खंडित

शेतकरी

उस्मानाबाद – कोरोनाचा कहर वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे सर्वच हैराण आहेत. एकीकडे लॉकडाऊनची चिंता तर दुसरीकडे भर उन्हाळा त्यातच महावितरण कंपनीने विजबील वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विजपुरवठा तोडण्याची धडक मोहीम राबविली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत तब्बल ३० हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कापण्यात आल्याचे समोर आले आहे.

एकीकडे कोरोनाने कंबरडे मोडले असतानाच आता शेतकऱ्यांना महावितरणने चांगलाच ‘शॉक’ दिला आहे. मुक्या जनावरांसह माणसंही पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी यासह अस्मानी अन् सुलतानी संकटाची साडेसाती काही केल्या शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यातच कोरोना या महामारीने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडेच मोडले. जरबेरा, फुल शेतीसह बागायतदारांना जबर फटका बसला.

गतवर्षी वरूणराजाने चांगलीच मेहरबानी केल्याने सध्यस्थितीत विहिरी, कुपनलिकांसह तलाव, मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे देणारे पीक असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. तसेच इतर पीकेही चांगल्या प्रकारे जोपासली असून बहरली आहेत. अनेक संकटावर मात करून कसा-बसा सावरलेल्या शेतकऱ्यांवर आता महावितरणने सुलतानी पध्दतीने घाव घातल्याचा आरोप होत आहे.