उस्मानाबाद – जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो जवळपास ५० रुपये किलोने विक्री होत होते. मात्र, आता परिस्थिती अशी आहे की सध्या १० रुपये किलोनेही ग्राहक टोमॅटो खरेदी करायला टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर कोबी, पालक, मेथी, कोथिंबिरीची भाव घसरलेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोसह विविध भाजीपाला पिकवून बाजारपेठेत आणला. पण आता टोमॅटो, कोबी, पालक, मेथी, काकडीसह इतर भाजीपाल्याची आवक बाजारात वाढली आहे.
यामुळे बाजार समितीत टोमॅटोची प्रति किलो ३ ते ५ रुपये तर किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच पानकोबीची ५ ते ७ रुपये किलोने ठोक विक्री होत आहे. किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलोने विक्री होत आहे. अत्यल्प भावामुळे मशागतीचा खर्च तर सोडा शेतातून बाजारात माल आणायचे भाडेही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
दरम्यान, सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढलेत. अतिवृष्टीने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारपेठेत कांद्याचे वांदे झालेत. व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केल्याने भाववाढीचा सर्वात जास्त फायदा त्यांनाच मिळतोय. बाजारात ४० ते ६० रुपयांपर्यत प्रति किलो कांदा विकला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- महत्त्वाची बातमी – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी ‘ही’ आहे अट
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना सातत्याने वाढत असल्यामुळे ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर
- राज्यात लॉकडाऊन होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही – दत्तात्रय भरणे
- राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात अवकाळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान
- पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय