मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रानेही या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

या संदर्भातील पत्र व्यवहार राज्य सरकारकडून करण्यात आल्याचे समजते.याशिवाय राज्य आपत्ती मदत निधीच्या (एसडीआरएफ) माध्यमातून प्रभावित व्यक्तींना मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याच्या वृत्ताला मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी दुजोरा दिला.

‘कोरोना संकट एक आपत्ती आहे. पण या संकटाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या संकटाचा फटका बसलेल्यांना वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत देता येत नाही. कोरोनाला नैसर्गिक संकट घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात यावा. केंद्रानं यासंदर्भात पावलं उचलायला हवीत,’ असं कुटेंनी सांगितलं.

एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहिले असताना दुसरीकडे कॉंग्रेसला मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत अपुरी वाटत असल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसने देखील एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –