उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन बाबत केलं महत्वाचं भाष्य

अजित पवार

पुणे – राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे या काही लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक रुग्ण सापडणाऱ्या शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाईल इशारा याआधीच दिला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह कोरोना रुग्णांचा आकडा अधिक असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन होणार का ? याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत अत्यंत महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘राज्यातील काही शहरांमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून निर्बंध लावले आहेत. त्यामुळे तुर्तास राज्यातील लॉकडाऊनबाबत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,’ असं सांगतानाच पुढे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परिस्थिती गंभीर वाटल्यास ते लॉकडाऊनचा निर्णय घेतील असा इशाराही दिला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबात चिंता व्यक्त केली आहे. तसेच, परिस्थिती न बदलल्यास राज्यात लॉकडाउन लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे,’ अशी माहिती पवारांनी दिली आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला कोरोना परिस्थितीसंदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाष्य केलं आहे.