विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचे  संरक्षण व संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना जराही धक्का लागता कामा नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कांदळवन संवर्धनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली.
ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या किनारी आणि सागरी जैव वैविध्याविषयीची यांत्रिक उपकरणांद्वारे दृष्य, श्राव्य आणि स्पर्शिक घटकांच्या माध्यमातून माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईत माहिती केंद्र सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

जनतेला आपुलकी वाटेल असे उपक्रम राबवा; शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

कांदळवन सागरी किनारपट्टीचे संरक्षण करतात.  समुद्रातून येणाऱ्य़ा लाटांना ती अभेद्यपणे रोखतात. जमिनीवर  तसेच सागरी परिक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या जीवांना आसरा देतात. निसर्गाचा  समतोल राखण्यास मदत करतात. म्हणून कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे.त्यासाठी कांदळवनांबद्दल जनतेला आपुलकी वाटेल असे उपक्रम राबवावे. कांदळवनाच्या माध्यमातून निसर्ग पर्यटन आणि उपजीविका कार्यक्रम वाढीस लागले पाहिजे. कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. प्रस्तावित जाइंट्स ऑफ द सी म्युझियम ,ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यासाठी जेट्टीचा विस्तार, भांडुप पंपिंग स्टेशन येथे सुविधा पुरविणे अशा ज्या योजना व जे उपक्रम प्रलंबित असतील ते मार्गी लावले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी  सफारी सुरू करावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

अतिक्रमणे हटवावी

कांदळवनाच्या जागेत अनेक बांधकाम व्यावसायिक आणि इतर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत.ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी व यापुढे अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

ऐरोली माहिती केंद्र

ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राला आपण भेट दिली होती. पर्यटकांसाठी हे केंद्र सर्व सोयींनी सुसज्ज आहे अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कोकण विभागीय आयुक्त, मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्हाधिकारी, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, वन विभागाचे सहसचिव अरविंद आपटे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –