ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा; ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीत प्रवेश मिळणार

शेतकरी

नवी दिल्ली – कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ‘प्रजासत्ताक दिना’ला ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी शेतकरी संघटनांकडून तीन सीमांची निश्चिती करण्यात आली आहे.

सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला होता. आता पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेत या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास दोन महिने उलटून गेले आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे.

ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगली चर्चा झाली असून शेतकऱ्यांना तीन बॉर्डरमधून दिल्लीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली शहरात काही किलोमीटर आतमध्ये येण्यास त्यांना परवानगी देण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या टॅक्टर रॅलीसाठी टिकरी बॉर्डवर ७ ते ८ हजार ट्रॅक्टर दाखल झाले आहेत, तर गाझीपूर बॉर्डवर १ हजार आणि सिंघू बॉर्डरवर 5 हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत. ही रॅली व्यवस्थित पार पदवी यासाठी पोलीस तयारी करत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी लेखी परवानगी देखील मागितली आहे.

‘आज शेतकऱ्यांसोबत चांगली चर्चा झाली. संपूर्ण सन्माने ट्रॅक्टर रॅली करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर या तिन्ही ठिकाणांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसाठी प्रवेश करू शकतील’ असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. दरम्यान, सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाझीपूर यूपी गेट या तीन सीमांवरून आत येण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली असून दिल्ली पोलीस नियमावली देखील जाहीर करतील असं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –