राज्यातील ‘या’ जिल्ह्यात स्वस्तधान्य दुकानातून निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वितरण

ज्वारी

परभणी – अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेवर देण्यात येत असलेली ज्वारी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची व काळया रंगाची आहे. त्यात बुरशी, कचरा व जाळे असल्याची तक्रार देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे. दरम्यान, शिधापत्रिकेवर मिळालेली ज्वारी जिल्हाधिकार्‍यांना पुरावा म्हणून सादर केली असल्याचेही बोधणे यांनी या वेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत येणारे कुटूंब हे दारिद्र रेषेखालील तसेच गरीब असतात. या प्रकारची निकृष्ट दर्जाची ज्वारी त्यांना खायला देणे म्हणजे त्यांची थट्टा केल्यासारखे आहे. एकीकडे शासन गोरगरीबांना धान्य पुरवठा केल्याबाबत मोठमोठे आकडे देत असताना या प्रकारच्या निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करणे ही गंभीर आहे.सध्या जिल्हाभरामध्ये वाटप होत असलेल्या व भविष्यात या योजनेअंतर्गत येणारी ज्वारी याची परभणी जिल्हयातील प्रत्येक तालुक्याअंतर्गत येणार्‍या शासकीय गोदामावर गुणवत्ता तपासणी करण्याबाबत त्या – त्या तालुक्यातील तहसीलदार यांना सूचित करावे, असेही यावेळी बोधणे यांनी म्हटले आहे.

सध्याची तसेच भविष्यात येणारी ज्वारी जर निकृष्ट दर्जाची आणि खाण्यायोग्य नसेल तर, वरिष्ट पातळीवर या बद्दल अहवाल पाठवा. जिल्हयातील शिधापत्रिका धारकांना चांगल्या दर्जाची व खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून द्यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष या विषयावर जनआंदोलन उभे करेल असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटु कदम, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, बाळू नरवाडे, बंडु पावडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.