राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका – अजित पवार

अजित पवार

मुंबई – वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधला. ‘सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली, तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोरानाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा. असा दम देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा ३ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला जाते. रोजंदारीवरील कामगारांना चूल पेटवता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.

तसेच, भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत. हे वाद जिल्हा, तालुका, गावात पोहोचले आहे. पाण्याचा थेंब साठविणे गरजेचे आहे. पाणी जीवन आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे व नाशिक या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –