पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे (हवाई पद्धतीने) बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा येथील समिती कक्षात यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. एकंदर 4 कोटी रोपे लावण्यात येणार आहेत असे वन विभागाने सांगितले.

सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी

वृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केली.

भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड व्हावी

प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती,जमीन याचा अंदाज घेऊन व जी  झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे.वृक्षारोपण करताना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे. वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावा

वृक्ष लागवड करताना पर्यटनाचाही विचार व्हावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरित्या दरी फुलून जाते. त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वनविभागाने करावा.
झाडांच्या देशी प्रजाती लावण्यावर भर देण्यात यावा जेणेकरून पक्ष्यांना देखील खाद्य व आश्रय मिळेल.

जव्हार, कोल्हापूर, सावंतवाडी, वनविभाग, मेळघाट व अमरावती वन विभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे बीज पेरणी करताना नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचाही त्यामध्ये समावेश करावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

नियोजनबद्ध वृक्ष लागवड व्हावी

वृक्ष लागवड करताना अधिक नियंत्रित पद्धतीने व नियोजनबद्धरित्या करण्यात यावी. यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,  मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सहसचिव अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्वश्री प्रवीण श्रीवास्तव, प्रदीप कुमार, एन. के. राव आदी अधिकारी नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अशी असते हवाई बीज पेरणी…

कमी वेळात जास्त दुर्गम क्षेत्रात व मोठ्या क्षेत्रावर वृक्षाच्छादन करण्यासाठी हवाई बीज पेरणी हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्याचे दोन प्रकार आहेत.

१. बीज गोळा पेरणी (Seed ball)
२. रोप लागवड (रोपवाटिकेमधील तयार रोपे)

या पावसाळ्यात काही निश्चित क्षेत्रावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बीज गोळे (seed ball) पेरणी करुन त्या क्षेत्रावर तयार होणाऱ्या रोपवनाचे परिणाम निरिक्षण करण्यात येईल.

ड्रोनचा वापर करून बीज गोळा पेरणी करण्यात येऊन त्याची तपासणी करता येईल.

स्थानिक जंगलातील प्रजातींचे जमा केलेले बीज, माती व शेणखत याचे मिश्रण याद्वारे बीज गोळे तयार करुन व त्यांना सुकवून त्यांचा वापर करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –