कोविडवर मात करण्यासाठी सर्वांचे लसीकरण आवश्यक – नितीन राऊत

नितीन राऊत

नागपूर – वाढता कोविड प्रादूर्भाव पाहता प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यावर आपण या संकटावर मात करु, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

डॉ.राऊत यांनी शहरातील विविध लसीकरण केंद्र तसेच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. आमदार निवास येथील इमारत क्रं. 2 येथे कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन् बी, महापालिका उपायुक्त राम जोशी तसेच येथील वैद्यकीय अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

काही रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे इतरांपेक्षा वेगळी आढळतात. अशा केसेसचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानुसार कोविड प्रोट्रोकॉलमध्ये बदल करता येईल. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे श्री.राऊत यावेळी म्हणाले.

पाचपावली येथील महिला रुग्णालयातील लसीकरण केंद्रालाही पालकमंत्र्यांनी भेट दिली. प्रभारी वैद्यकीय अधिकारी संगीता बालकोटे यांनी लसीकरण केंद्रामध्ये असलेल्या सुविधांची माहिती दिली. लसीकरण झाल्यानंतर विश्रांतीसाठी असलेल्या निरीक्षणगृहामधील नागरिकांशी पालकमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला. त्यानंतर पाचपावली पोलीस क्वॉर्टर सभागृहातील कोविड चाचणी केंद्राला भेट दिली. येथील दैनदिन कोविड चाचणी क्षमता, दाखल रुग्ण व त्यांचे औषधोपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार तातडीने मिळावे याबाबत सबंधितांना निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुसरा डोज

पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोज घेतला.  मेडिकलचे अधीष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यावेळी उपस्थित होते.

विक्रमी लसीकरण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन व प्रशासनाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. दररोज चाळीस हजारांवर लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आखले असून त्यासाठी शहर व ग्रामीण भागात महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीही करणे सुरू आहे नागरिकांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण होत आहे. काल शनिवारी (ता. 3)जिल्ह्यामध्ये लसीकरणाची विक्रमी नोंद झाली . शनिवारी जिल्ह्यात एकूण 41 हजार 556 लोकांचे लसीकरण झाले. हे आजवरचे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण आहे.

काल राज्यात एकाच दिवशी 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण झाले

पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 76 हजार 594, मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33 हजार 490) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आणखी शंभर खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात अतिदक्षता विभागातील 30, ऑक्सीजन सुविधा असणारे 30, सारी रुग्णांसाठी 10 व रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या 30 अतिदक्षता अशा एकूण शंभर खाटांचा समावेश आहे. यापूर्वीच्या सहाशे खाटा मेडिकल मध्ये उपलब्ध आहेत. आता आणखी शंभर खाटांचे भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजारपेक्षा जास्त वाढविण्यात येणार आहे.

कॉल सेन्टर सुरू

ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना नागपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटलमधील खाटांची संख्या व अन्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 0712-25 62 668 या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना आता मेयो व मेडिकलसह अन्य हॉस्पिटलची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा.

महत्वाच्या बातम्या –