रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ

शिर्डी – देशात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होत असून, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगांव येथे केले.

कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोविड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदशन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ओमप्रकाश पोखर्णा, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे आव्हाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, शहरी आरोग्य अभियानाच्या डॉ.गायत्री कांडेकर, गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून, पहिल्या आणि आताच्या लाटेतील रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आहे. कोरोना हे मानवजातीवर आलेले संकट असून तो रोखण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून करावे. केंद्र शासनाने रेमडेसिविर औषध निर्यात करण्यास बंदी घातली असल्याने या औषधाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल चोवीस तासात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडण्याचे आणि कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सांगितले. आमदार आशुतोष काळे यांनी कोविड रुग्णांसाठी ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा नाशिक जिल्ह्यातून पुरवठा करावा, कोविड केअर सेंटरला ऑक्सिजनची जोडणी तातडीने करण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा नागरिकांनी स्वयंशिस्तीने अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याचे आणि चाचणी अहवालाचा कालावधी कमी केल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगावातील कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्याची भेट

एसएसजीएम कॉलेज आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कोविड केअर सेंटरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, औषधे, नाष्टा व जेवण, परिसराची स्वच्छता, पिण्याची पाण्याची व्यवस्था याबाबत पालकमंत्र्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनातर्फे केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबधितांनी दक्षता घेण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या –