शेतकऱ्यांनो ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा; ‘या’ नेत्याने केलं आवाहन

शेतकरी

अफजलगढ – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नाही. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील कित्येक बैठका या निष्फळ झाल्या आहेत. तर, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये काढलेल्या ट्रॅक्टर रॅली वेळी झालेल्या गोंधळानंतर सरकारने चर्चेचे दरवाजे बंद करून टाकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असली तरी हे तीन कायदे पूर्णपणे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला होता. यावेळी सार्वजनिक संपत्तीसह जीवितहानी देखील झाली होती. या घटनेमुळे शेतकरी आंदोलनात फूट पडल्याचे दिसून आले होते. एवढचं नाही तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी देखील यावर भाष्य केल्यानंतर शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांचे आंदोलन हे अद्याप कायम असून आता हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. भारतीय किसान युनियन चे नेते राकेश टिकैत यांनी रविवारी रात्री बिजनौर येथील अफजलगढ मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पुढील रणनीतीची माहिती दिली आहे.

‘केंद्र सरकारची शांतता सांगत आहे की ते शेतकरी आंदोलनाच्या विरोधात काहीतरी कुटील डाव रचत आहेत. जर शेतकरी व सरकारमधील चर्चा पुन्हा सुरु करायची असेल तर सरकारनेच पुढाकार घ्यावा,’ असं राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. ‘जो पर्यंत शेतकऱ्यांचं पूर्ण समाधान होत नाही तोवर माघारी फिरणार नाही. शेतकऱ्यांनो ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा,’ असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –