कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करा – छगन भुजबळ

छगन भुजबळ

नाशिक – कोरोनाचा वाढता संसर्ग शहरासोबतच ग्रामीण भागातही वाढत आहे. याअनुषंगाने येवला शहरातील भाजी मंडईतील विक्रेते व नागरिकांशी संवाद साधत त्यांना कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला शहरातील भाजी मंडईसह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रांतअधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी येवला शहरातील शनी पटांगण येथे भाजी बाजाराची पाहणी करून त्यानंतर शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी फळविक्रेते, हॉटेल यासह विविध दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मास्क वापरण्याचे व कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे देखील आवाहन केले. तसेच मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना  दिल्या आहेत.

पालकमंत्र्याकडून येवला उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी

यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील कोविड लसीकरण केंद्राची व डेडिकेटेड कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णाशी संवाद साधला. तसेच तेथे रुग्णांना पूरविण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून नियोजनाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –