विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वर्षा

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्वाची बातमी असून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.

त्यामुळे, पहिली ते आठवीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी परीक्षेशिवायच पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी हेही वर्ग सुरू भरलेच नाहीत. केवळ, ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगलच्या माध्यमातून आपण शिक्षण सुरू ठेवलं होतं, असे शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

शालेय शिक्षण विभागाचे वतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे सुरू ठेवणेबाबत कळविण्यात आले होते व याला राज्यातील शिक्षकांनी उत्तम स्वरूपात प्रतिसाद दिला. राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिकणे वेगवेगळ्या मार्गांनी कसे सुरू राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. ज्या ज्या मार्गाने विद्यार्थ्यांपर्यत पोहोचता येईल त्या त्या मार्गाने विद्यार्थ्याना अध्यापन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या परीने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.

अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन देखील महत्वाचे आहे. या काळात शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून येत आहे. राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे 1 ली ते 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे मत यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या –