पीकविमा कंपनीसाठी शासनाकडून ८३३ कोटीचे अनुदान मंजूर;पण राज्यातील बळीराजा मात्र विम्याच्या प्रतीक्षेत

शेतकरी

उस्मानाबाद – राज्यातील बळीराजा हा नेहमी वेगवेगळ्या समस्यांशी झुंजत असतो. निसर्ग, सरकार आणि विमा कंपन्या अशा त्रिसूत्री समस्यांना सध्या बळीराजा तोंड देत आहे. याच तीन समस्येपैकी एक म्हणजे विमा कंपन्यांना सरकारने अनुदान मंजूर केले, पण बळीराजा मात्र विम्याच्या प्रतीक्षेत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम सन २०२० अंतर्गत विमा कंपनीसाठी राज्य सरकारच्या हिस्यापोटी शासनाकडून ८३३ कोटी ८५ लाख ५५ हजार ७७१ रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

विमा कंपनीस राज्य सरकारच्या हिस्स्याचे एकूण २४२३ कोटी ३२ लाख रुपयाचे अनुदान मिळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे गतवर्षी खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून बहुतांश शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तत्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश पीकविमा कंपनीस द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

जिल्ह्यातील जवळपास सव्वाचार लाख शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरून पिके विमासंरक्षीत केली होती. परंतु ऑक्टोंबर महिन्यात ऐन खरीपाच्या काढणीच्या वेळी अतिवृष्टीने जिल्ह्यास झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास अतिवृष्टीने हिरावून नेला. काही शेतकऱ्यांच्या तर शेतातील पिकांसह मातीही वाहून गेली. खरीपातील सोयाबीन, उडीद, तूर, मूग, खरीप ज्वारी आदी पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: कधी अवकाळी तडाखा, कधी गारपीट, कधी दुष्काळ, कधी शेतमालाचे गडगडलेले दर तर कधी कोरोना संकट, लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या –