शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ‘हा’ नेता आक्रमक

महावितरण

बीड – गेवराई तालुक्यात महावितरण कंपनीकडून बील वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. याविरोधात शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंडित यांनी शेतकऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात ठिय्या देताच कंपनीने नरमाईची भूमिका घेतली. प्रति पंप पाच हजार रुपये वसुली आणि सहाऐवजी आठ तास वीज पुरवठा या दोन मागण्या मान्य करण्यास पंडित यांनी भाग पाडले.

गेवराई तालुक्यातील शेतकरी वर्ग कोरोना, लॉकडाऊन आणि मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. खरिपाने दगा दिल्याने रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, अशातच महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. वीज तोडल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

याची दखल घेऊन शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी शेतकऱ्यांसोबत महावितरणच्या कार्यालयात ठिय्या दिला. यावर अभियंता शिवलकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेत वरिष्ठांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. अखेर बदामराव पंडित यांनी प्रति कनेक्शन पाच हजार रुपयांची वसुली, कृषी पंपांना सहा ऐवजी आठ तास विद्यूत पुरवठा या मागण्या मान्य करून घेतल्या. यावेळी माजी सभापती अभिजित पंडित, पंचायत समिती सदस्य भीष्माचार्य दाभाडे, बापू चव्हाण, मुकुंद बाबर, बदाम पौळ, विश्वनाथ सोनवणे, अमोल वाकडे, सुनील वाकडे, कैलास वाकडे, मदन गवारे, विष्णू आंधळे, भीमराव कोठेकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी उद्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला

महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली मोहीम केवळ गेवराई नव्हे तर बीड जिल्ह्यात सुरू केली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बदामराव पंडित हे उद्या बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्याकरिता काही शेतकरी प्रतिनिधींसोबत ते आज मुंबईला रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –