नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता पडणार नाही – अमित देशमुख

लातूर – महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर आणि चिंताजनक होत चालली आहे. लातूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असे सांगून जनतेनेही या संबंधाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून याकामी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील सध्याची वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य तसेच पोलिस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सर्वजण तत्पर आहेत. सर्वतोपरी उपाययोजना आखण्यात येत आहेत. प्रशासनाने या संदर्भाने काही निर्बंध जारी केले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासोबतच नागरिकांसाठीही काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये नियमीत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यासह इतर सूचनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, कामावर जाणाऱ्या व्यक्तींनी सूर्यास्तापूर्वी घरी परतावे, सूर्यास्त ते सूर्योदय या काळात सर्वांनी शक्यतो घरीच राहावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन केल्यास या प्रादुर्भावावरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता पडणार नसल्याचे देशमुख यांनी या वेळी म्हटले आहे.

रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आणि तत्पर आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, मात्र मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ती सर्वजण योग्यरीत्या पार पाडतील असा विश्वास देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –