कराड – ५ एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर यापूर्वी झाला नाही असा धमाका गनिमी काव्याने करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी दिला आहे. यानंतर, ‘ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही त्यांची आरआरसी (रेव्हेन्यू रिकवरी सर्टिफिकेट) करायला आम्ही तयार आहोत,’ असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे.
राजू शेट्टी यांनी आज थकित एफआरपी आणि वीजबिलासंदर्भात सहकारमंत्र्याच्या नेतृत्वात असलेल्या सह्याद्री कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शेट्टी कारखान्यावर पोहोचण्यापुर्वी पोलिसांनी त्यांना पुणे-बंगळूर महामार्गावर ताब्यात घेतले. तेथून त्यांना कराडच्या शासकीय विश्रामग्रहात आणले. तेथे शेट्टींनी ठिय्या आंदोलन छेडले. सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय कराड सोडणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना शेट्टींनी स्पष्ट केले.
दुपारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत शेट्टींनी त्यांचे मुद्दे मांडले. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती शेट्टी यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, ‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहेत. 31 मार्च अखेर साखर कारखान्यांकडे 2300 कोटी एफआरपीची थकीत होती. आम्ही पाच एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत. तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू. शेतक-यांच्या पिळवणुक करणा-या साखर कारखानदारांना आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवू,’ असा इशारा शेट्टींनी दिला.
त्याआधी कराडच्या शासकीय विश्रामग्रहात माध्यमांना बोलताना त्यांनी सांगितले कि ‘राज्यातील साखर कारखाने सुरु होऊन ५ महिने झाले आहेत. तरी सुद्धा काही साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाहीये. सहकारमंत्र्याच्या नेतृत्वात असलेला सह्याद्री साखर कारखान्याने सुद्धा एफआरपी दिलेली नाहीये. ऊस दर अधिनियमानुसार ऊस तुटल्याच्या १४ दिवसाच्या आत केंद्र सरकारने ठरवलेली ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजे, यासंदर्भामध्ये उच्च न्यायालयाने अनेक वेळा आदेश दिले आहेत. विलंब झाला तर १५ टक्के व्याजान रक्कम अदा करावी लागेल पण व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळालेलं नाहीये अस ते म्हणाले. वारंवार आम्ही साखर आयुक्तांकडे, सहकार मंत्र्याकडे खेटे घातले पण कारवाई काहीच झाली नाही.’ असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –