लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा – राजू शेट्टी

राजू शेट्टी

पंढरपूर – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधला. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या संभावित लॉकडाऊनला विरोध केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचा प्रचार करण्यासाठी राजू शेट्टी आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनला जोरदार विरोध केला. आधी शेतमालाला किंमत द्या, मगच लॉकडाऊन करा. ज्यांचा रोजगार बुडणार आहे त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला त्यांना भरपाई द्या. मग लॉकडाऊन करा. आमचं काही म्हणणं राहणार नाही. नुसताच लॉकडाऊन करतो म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा सरकारनं आम्हाला आमच्या नशीबावर सोडावं. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –