महत्त्वाची बातमी – औरंगाबाद शहरात आज रात्रीपासून ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी

संचारबंदी

औरंगाबाद : औरंगाबाद शहरवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. प्रभारी  जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. १४ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १४ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल. याकाळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग, कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार आहे.

शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची साखळी पसरण्यास सुरूवात झाली आहे. दररोज शंभर ते दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिकेने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. एखाद्या कॉलनीत अथवा वसाहतीमध्ये वीसपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले तर तो भाग सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर १११ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७७० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३२ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक ११३ ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –