शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

लातूर – केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली चर्चा केली, आणखी काही मुद्यांवर पुढे चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.नगर,लातूर ,धुळे, जळगाव, बुलडाणा, नाशिक, मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं.

भाजप सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अकोला शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल पुन्हा दिली. नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी काल नवी दिल्लीत झाली,त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते. आजची चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि चर्चेची पुढची फेरी येत्या ५ तारखेला शनिवारी होईल, असं तोमर यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –