पुणे – कोरोनाचं संकट पुण्यात पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.
गेल्या आठवड्यात असणारा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढत आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक पार आज पडली. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्तांसह आरोग्य विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात 1300 च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1700 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही 4.6 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर गेला आहे. सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला तरी मोठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, करोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायजर आणि सुरक्षित वावर या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे. शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत.
लवकरच चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ससूनसह पालिकेच्या रुग्णालयात 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल; ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस
- तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल हे फायदे, जाणून घ्या