कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ‘या’ जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर

संचारबंदी

मुंबई – गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थीती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलत आहे.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू येथे दैनंदिन कोविड रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या 24 तासात 17,921 नव्या रुग्णांची नोंद झालीयापैकी 83.76% रुग्ण या सहा राज्यांमधले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 9,927 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 2,316,तर पंजाबमध्ये 1,027 नव्या रुग्णांची नोंद झाली.

कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद राहतील. खासगी कार्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात शहरात नागरिकांच्या संचारावर कडक बंदी घालण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रात्री ९ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर शनिवार- रविवारी शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत निर्बंध कडक केले आहेत. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी जनता संचारबंदी तसेच सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेशाचे पत्र काढले आहे. १२ मार्चपासून हा नियम लागू होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत.

दरम्यान,दिवसेंदिवस पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच जात आहे.पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू आहे तर शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. असं असलं तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिकचे काही निर्बंध लावण्याचा विचार महापालिका पातळीवर सुरू आहे.

महत्वाच्या बतम्या –