कोरोनाची दुसरी लाट आणि अवकाळीचा तडाखा अशा या दोन्ही संकटांना महाराष्ट्र तोंड देण्यास समर्थ

शेतकरी

मुंबई – दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. यामध्ये राज्यात सर्वत्र मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे आधीच कोरोना काळात कंबरडे मोडलेल्या शेती व्यवसायाला पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आणि अवकाळी पाऊस असे दुहेरी संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटांना सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे . महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हा वर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राला सध्या एकीकडे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांचे आकडे नवनवे उच्चांक गाठू लागले आहेत. पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असतानाच अवकाळीचीही लहर फिरली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठय़ा भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठय़ा भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता.

आता मार्चमध्ये परत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. चार महिन्यांत तिसऱयांदा हा तडाखा बसला. म्हणजे अवकाळी आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी हे दर महिन्याचे संकट झाले आहे. दोन-तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे गहू, हरभरा, भाजीपाला, संत्र, द्राक्ष, आंबा, पपई, कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच द्राक्षाचे भाव पडले आहेत, त्यात अवकाळीच्या तडाख्याने आहे त्या द्राक्षबागांचे नुकसान केले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर पडेल त्या किमतीला द्राक्ष विकण्याची वेळ येऊ शकते.

विदर्भातील संत्रा पिकाचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. यंदा संत्रा उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळीच्या लागोपाठ बसलेल्या तडाख्यांनी त्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने संत्राला गळती लागली आहे. गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ही दोन्ही पिके शेतातच मातीमोल झाली आहेत. बरं, कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे कोरोना निर्बंध पुन्हा कठोर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याचा परिणाम शेतमालाच्या उपलब्धतेवर, विक्रीवर झाला आहे. त्यात अवकाळीच्या तडाख्याने पीक उत्पादन घटू शकते. त्यामुळे पिकांची भाववाढ होण्याचा धोका आहे.

सध्याच्या लॉकडाऊनमुळे आधीच गव्हाचे भाव प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढले आहेत. आता अवकाळीमुळे गहू शेतातच आडवा झाल्याने उत्पादन घटणार आणि आणखी भाववाढ होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंबा, कांदा, कोथिंबीर, हळद या पिकांचीही दुरवस्था झाली आहे. खरीप हंगाम रोगराईने खाल्ला आणि रब्बी हंगामावर अवकाळी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हल्लाबोल केला. वर्षभराच्या कोरोना संकटानंतर ग्रामीण अर्थकारणही आता कुठे सुरळीत होत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेने ते परत विस्कळीत केले आहे. दैनंदिन भाजीविक्रीपासून छोटय़ा-मोठय़ा व्यवसायापर्यंत सगळ्यांवरच निर्बंधाची कुऱ्हाड पडली आहे.

त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने बळीराजाच्या उरल्यासुरल्या आशेवर आणि उत्पादनावर पाणी फेरले आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटाला सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हा वर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल. प्रश्न आहे तो अवकाळीच्या लहरीचा व ही नैसर्गिक लहर आटोक्यात आणण्याचा. निसर्गाची लहर मानवी नियंत्रणापलिकडेच आहे. मात्र निसर्गावर कोणाचे नियंत्रण नाही असे म्हणून हतबल होऊन कसे चालेल? कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.’ असा आश्वासन आजच्या सामना अग्रलेखातून देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –