महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा – हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील

पुणे – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

दरम्यान, वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही  निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात अनेक दिवसांपासून वीजतोडणी मोहीम चालू आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री वीजतोडणी मोहिमेबाबत गप्प आहेत.सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही.

सध्या उन्हाळा वाढत असून, वीजतोडणी मोहिमेमुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या असंतोषाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नळ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा ‘महावितरण’ने खंडित करू नये अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

महत्वाच्या बातम्या –