सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा – जयंत पाटील

जयंत पाटील

सांगली – टेंभू, ताकारी, व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणी वाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम व प्रभावी करावी. या योजना सौर ऊर्जेवर चालवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात पालकमंत्री जयंत पाटील यांनी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योति देवकर, तसेच कार्यकारी अभियंता सर्वश्री अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांच्या पाणीवाटपाबाबत व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना देवून त्यांनी सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डीग्रज बोरगाव कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरूस्ती कामे, आरफळ व कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. तसेच सिंचन योजनांची विद्युत देयक स्थिती, पाणीपट्टी वसुली, विविध बंदिस्त नलिका कामे, प्रगतीपथावरील व प्रस्तावित कामे, योजनांची सद्यस्थिती, भूसंपादन आदींबाबत सविस्तर आढावा घेवून संबंधिताना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगांव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण झाले असून प्रति हेक्टरी खर्च मापदंड शासनास त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महत्वाच्या बातम्या –