गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी – दादाजी भुसे

कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव –  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

विश्रामगृहात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते, यावेळी उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, पोलीस उपअधिक्षक प्रविण जाधव, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उपायुक्त नितीन कापडणीस, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, अतिरिक्त शल्यचिकीत्सक डॉ.हितेश महाले, डॉ.शैलेश निकम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, शाळा, कॉलेज व खाजगी क्लासेस यांची संयुक्त बैठक घेवून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ऑनलाईन शैक्षणिक पध्दतीच्या अवलंबासह मर्यादित संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने संयुक्तपणे पथकांची नेमणूक करून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या टेस्टींगसह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे असेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील

मालेगाव शहरातील कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी नागरिकांनी गाफील राहता कामा नये. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही मंत्री श्री.भुसे यांनी दिला आहे. सर्व व्यावसायीकांनी देखील मास्क नाही तर प्रवेश नाही अशी भूमिका घेवून येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

कोरोना रुग्णांचा शहरासह ग्रामीण भागाचा आढावा घेतांना ग्रामीण भागातील रुग्णांसाठी झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयासह निमगाव येथे पर्यायी व्यवस्था अद्ययावत ठेवण्यात यावी. सामान्य रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनास यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या –