‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त रोहित पवारांनी शेतकऱ्यांना भेटून कृतज्ञतापूर्वक प्रेम व्यक्त केलं

पुणे – जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रेम हे फक्त प्रियकर-प्रेयसीच पुरते मर्यादित नसून ते सबंध जगात विविध नातेसंबंधांना दृढ करण्याचे काम करते. याचाच प्रत्यय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज दिला.

आ. रोहित पवारांनी व्हॅलेंटाइन डेनिमित्त जगाच्या पोशिंद्यांची भेट घेऊन त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी याबाबत स्वत: ट्वीट करून माहिती दिली. प्रेम आणि आपुलकीची सर्वाधिक गरज बळीराजाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी मांजरी बाजारात जाऊन तेथे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, “शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. पण देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा, त्यांच्या हक्कांचा अवमान होत असताना आज प्रेम आणि आपुलकीची सर्वाधिक गरज या बळीराजाला असल्याचं मला वाटतं. त्यासाठी आज ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मांजरी बाजारात शेतकऱ्यांना भेटून कृतज्ञतापूर्वक प्रेम व्यक्त केलं. तुम्हीही शेतकऱ्यांविषयी असंच प्रेम व्यक्त केलं तर मलाही आनंद होईल. म्हणून ‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असला तरी अन्नदात्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यालाही एक फूल देऊन कृतज्ञतापूर्वक प्रेम व्यक्त करूयात! #valentinewithfarmers”

आपल्या ट्वीटमधून आ. रोहित पवारांनी शेतकऱ्यांविषयी प्रेम व्यक्त करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. आ. रोहित पवारांच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. केंद्रातील कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादीनेही दंड थोपटले असून त्यात अनेक सुधारणांची बाजू घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला यापूर्वीच रोहित पवार आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दर्शवला होता.

महत्वाच्या बातम्या –