अन्नधान्य पुरवठा, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, गृह अलगीकरण, मायक्रो झोन याकडे गंभीरतेने लक्ष द्या – नितीन राऊत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर – नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे.मात्र या सोबतच लॉकडाऊनच्या काळामधील अन्नधान्य पुरवठा,कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेन्टरची संपर्क व्यवस्था या बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या अन्नधान्य पुरवठा, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, तसेच सुलभ संपर्क व्यवस्थेसंदर्भात अर्थात कॉल सेंटर संदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने ज्या क्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्याकडेही लक्ष देणारी यंत्रणा अधिक गतिशील करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागपूर शहरातील उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेडची उपलब्धता या कळीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात प्रशासन जागरूकतेने काम करत आहे .आपण स्वतः देखील या कामी पाठपुरावा करत आहे. मात्र यासोबतच जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध सुरू केले आहे. नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे गरिबांच्या मूलभूत सुविधासंदर्भातही जागरूक असणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानामार्फत राज्य व केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य वाटपासंदर्भातील घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी वितरण यंत्रणेमार्फत होणार आहे. त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ पत्रिका धारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकामध्ये ३ लाख १५ हजार ८२ पत्रिका धारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप केल्या जाणे आवश्यक आहे.मात्र हे वाटप करताना शिधापत्रिकाधारकांपैकी अनेक जण पॉझिटिव्ह असल्याची शक्यता नाकारता येत नाही.यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने रेशन दुकानदारांना पॉश मशीनद्वारे वाटपाची असणारी अट शिथिल करावी, तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी पुढे आली असून या संदर्भात काय उपाययोजना करता येईल , याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा. यासंदर्भात प्रसंगी वरिष्ठांशी चर्चा करता येईल, असेही सांगितले.

एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे त्यांनी जिल्हाधिकारी  रवींद्र ठाकरे यांना निर्देशित केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण संदर्भातही आढावा घेतला. सध्या इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर,पाचपावली महिला रुग्णालय, मनपा आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू करता येऊ शकते. तथापि, महानगरपालिकेला आतापर्यंत किती डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हे नियोजन कधी सुरु करायचे हे ठरवले पाहिजे. नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येत असल्याची तक्रार आहे. नोंदणी प्रक्रिया देखील सहज,सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.याकडे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लक्ष वेधण्याचा आवाहन त्यांनी केले.

रेमडेसिवीर उपलब्धतेबाबतही त्यांनी आढावा घेतला. आतापर्यंत रेमडेसिवीरच्या ४ लाख ३५ हजार लसी मिळालेल्या आहेत. भिवंडी,पुणे आणि नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा होतो. या संदर्भात माननीय उच्च  न्यायालयाने देखील इंजेक्शन पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २१ ते २८ एप्रिल अखेरपर्यंत २ लाख ९८ हजार २४ इतका साठा खाजगी व शासकीय रुग्णालयात आत्तापर्यंत आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली.

ऑक्सिजन पुरवठयाबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. आयनॉक्स इंडिया, लिंडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जेएसडब्ल्यू, याशिवाय अनेक छोटे उत्पादक ऑक्सिजन निर्मिती करतात. दर दिवशी या सर्वांची निर्मिती क्षमता १२७० टन आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी १ लक्ष ७८४ टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केला आहे. या व्यतिरिक्त आपल्या राज्याला छत्तीसगड, कर्नाटक व गुजरातमधून अंदाजे २०० ते २५० टन ऑक्सिजन मिळत आहे. ऑक्सिजनची अधिक प्रमाणात वाहतूक व्हावी, यासाठी नायट्रोजनसाठी असणाऱ्या टँकरचे ऑक्सीजन टँकरमध्ये रुपांतर करणे सुरू आहे. त्यामुळे ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे. याशिवाय आणखी साडेतीनशे ते चारशे टन ऑक्सिजन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी दिली.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट निर्मिती संदर्भात आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. कामठी येथे खापरखेडा येथील प्लांट स्थानांतरित होत आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण होतील याकडे लक्ष वेधण्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात यावेळी त्यांनी आढावा घेतला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नियमित होते. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा अचानक कोरोनाची रुग्ण संख्या वाढायला लागली. त्यामुळे पूर्वी प्रमाणे प्रत्येक पॉजिटीव्ह रुग्णांमागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग व्हायला पाहिजे.

होम आयसोलेशन, मायक्रो झोन मधील रुग्णांच्या सातत्याचा संपर्कात असणे आवश्यक आहे.  मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली. त्या मॉडेलचा नागपूरमध्ये  उपयोग होतो का याची चाचपणी करण्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे मात्र त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –