सीसीसी बेडचे ऑक्सीजन बेडमध्ये रुपांतर करण्याचे पूर्वनियोजन करा – विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांची माहिती

चंद्रपूर – कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमधील (सीसीसी) सर्वसाधारण बेडचे गरजेनुसार ऑक्सीजन बेडमध्ये रुपांतर करण्याचे पूर्वनियोजन करून ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आढावा बैठकीत जिल्हा कोरोना टास्क समितीला केल्या.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कोरोना उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात काल आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे असून नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रूग्णांवर उपचार करतांना इतर व्याधीग्रस्त रूग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देवू नये असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रूग्णालयातील साफसफाई वेळच्या वेळी व्हावी म्हणून योग्य उपाययोजना करण्याचेही त्यांनी  सांगितले.

यावेळी पालकमंत्री यांनी उपलब्ध औषध साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेन्टीलेटर बेड, आयसीयु बेड व रिक्त बेड संख्या, तसेच लसीकरणाबाबत आढावा घेतला.
बैठकीला डॉ. सुधीर मेश्राम, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे,  संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘चंद्रपूर ऑनलाईन’ ॲपचे उद्घाटन

चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखणे महत्त्वपूर्ण झाले आहे अशातच जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर ऑनलाईन ॲप (chandrapur online App) मुळे नागरिकांना घरबसल्या बोटाच्या टोकावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय माहिती व सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होईल तरी चंद्रपूरकरांनी या मोबाईल तंत्रज्ञान सुलभ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या ॲपचे उद्घाटन प्रसंगी केले.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रॉइड स्टुडिओ व ओपन सोर्स फ्लटर फ्रेमवर्क वापरून विकसित केलेल्या ॲप्लीकेशनचे उद्घाटन पालकमंत्री वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले.

हे ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध असून या ॲप मध्ये कोविड-19 बाबत ची सर्व अद्ययावत माहिती, प्रशासनाचे आदेश, जिल्हा माहिती कार्यालयाच्या ब्लॉगवरील बातम्या, प्रशासनाचे जनतेकरिता वेळोवेळी केलेली आवाहने, महत्वाचे मदत कक्ष क्रमांक, आपत्कालीन मार्गदर्शक सूचना, आरोग्य विभागाच्या महत्वाच्या सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, सहाय्य आणि हेल्पलाईन क्रमांक, इतर महत्त्वाची माहिती, ऑनलाईन ७/१२ सुविधा व ८अ, निवडणूक विभागाची मतदार यादी मध्ये नाव शोधण्याची सुविधा, पुरवठा विभागाची रेशन कार्ड शोधण्याची सुविधा, ताडोबा सफर ऑनलाईन बुकिंग, तसेच इतर जिल्हा स्तरीय महत्वाचे कार्यालयांच्या वेबसाईट च्या लिंक या ॲप मध्ये दिल्या असून यात पुढे अधिक सेवांचा समावेश करण्यात येणार असल्याचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतिष खडसे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –