केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थीकडून एक कोटी ८५ लाख ७६ हजार रुपये वसूल

शेतकरी

नांदेड – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १० कोटी २ लाख ६ हजार रुपये जमा झाले होते. सदर रक्कम वसूल करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. या सुचनेप्रमाणे आतापर्यंत एक कोटी ८५ लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले. आणखी ८ कोटी १६ लाख ३० हजार रुपये वसूल करणे बाकी आहे.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला चार महिन्यात दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. केंद्र सरकारने या योजनेत पुढे बदल केले आणि सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले. या निकषामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शासकीय-निमशासकीय नोकरदार, आयकर भरणारे, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त यासह डॉक्टर, वकील, अभियंता, आजी, माजी लोकप्रतिनिधी, एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती यात पती-पत्नी यांनीही योजनेतून अर्ज भरला होता.

केंद्र सरकारने सर्व अपात्र आयकर भरणाऱ्यांची यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली होती. यात नांदेड जिल्ह्यातील ६ हजार ४९९ शेतकरी आयकर भरणारे असून त्यांच्या खात्यावर ६ कोटी ७ लाख २६ हजार रुपये जमा करण्यात आले होते. यात आतापर्यंत २ हजार १७ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८५ लाख ७६ हजार रुपये वसूल झाले आहेत.यात इतर अपात्रमध्ये किनवट तालुक्यातील ३३६ शेतकऱ्यांपैकी अद्याप एकाही शेतकऱ्याकडून वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. तर माहूरमध्ये केवळ एकाच शेतकऱ्याकडून वसुलीला यश मिळाले आहे. तसेच मुखेड तालुक्यातील आयकर भरणाऱ्या ६९१ शेतकऱ्यांपैकी २६६ शेतकऱ्यांनी २४ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –