शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा दणका, २० वर्षांत प्रथमच खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ

खत

बीड – कोरोना, लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेय. अवकाळी पावसाने तर रब्बी आणि खरिपातील पिके हातातून निघून गेली आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा दणका बसला आहे. या दरवाढीने शेतकरी हवालदिल झालेत.

खासगी कंपनीने खतांच्या किंमती नुकत्याच जाहीर केल्यात. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. तसेच १०:२६:२६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५ :१५ या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति बॅग झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२: ३२ : १६ हे खत १२५० रूपयांना मिळत होते. आता खताच्या बॅगला १८०० रुपये लागणार आहेत. २०: २० : ० खताची किंमत ९७० होती, ती आता १३५० रुपये झाली आहे.

गेल्या पंधरा वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली. त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केली. खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत मात्र आहे.

महत्वाच्या बातम्या –