धक्कादायक! लस घेतल्यानंतरही आतापर्यंत २१ जण कोरोना बाधित

कोरोना लस

औरंगाबाद – मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार वाढल्याने भीतीने असंख्य नागरिक लस घेत आहेत. संसर्ग वाढत असतानाच लसीकरण झालेले रुग्णही पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. लस घेतलेले आतापर्यंत २१ जण कोरोना बाधित झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ट नागरिक, आजारी व्यक्तींना लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ४६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यायचा आहे. त्यानंतर १४ दिवसानंतर ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल. त्यानंतर ७० टक्क्यांपर्यंत लस घेतलेल्या व्यक्तींना संरक्षण मिळेल. त्यामुळे लस घेणे प्रत्येकाच्या फायद्याचेच आहे.

काही जण पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाल्याचे तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. लसीकरणानंतर ७० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळणार आहे. ३० टक्के धोका आहे. दोन डोस घेतल्यानंतरही जरी कोरोना संसर्ग झाला तरी जीवाला धोका राहणार नाही. सौम्य स्वरूपाचा त्रास असेल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –