साहेब अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तेलही गेले अन तुपही गेले, आतातरी अनुदान वाटप करा हो

शेतकरी

औरंगाबाद – ‘साहेब अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तेलही गेले अन तुपही गेले. आतातरी अनुदान वाटप करा हो’, असा एकच टाहो वैजापुर तालुक्यातील कापुसवाडगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२२) तहसीलदार याच्याकडे मांडला. तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान होऊन पिक हातातून गेले होते. त्यातुन सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा गहू व कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या वादळी वारा आणि पावसाने त्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. मात्र अजूनही अनुदान मिळालेले नाही.

गहु व कांद्याचे पिकही शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा असून राहिलेल्या शेतकऱ्यांचे पिकही वेळोवेळी बदलणाऱ्या खराब हवामानामुळे व गारपीठ पावसाच्या संकटाने पिक धोक्यात आले आहे. परिसरातील सर्व गावांना पहिल्या टप्प्याचे अनुदान वाटप झाले तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वाटप सुरू झाले आहे. परंतु कापुसवाडगाव येथील शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही अनुदानाचा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी काल तहसीलदाराकडे धाव घेत लवकरात लवकर अनुदान जमा करण्याची मागणी केली. याबाबत मनसेनेही दोन ते तीन दिवसापूर्वीच निवेदन देऊन तत्काळ कापुसवाडगाव येथील शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची मागणी केली. परंतु त्या निवेदनाची अद्याप दखल घेतलेली नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकतून सांगितले जात आहे कापुसवाडगावचे अनुदान यादी व पैसे आमच्याकडे आलेच नाहीत तर गावचे तलाठी म्हणतात अनुदान यादी तहसील कार्यालयात जमा केलेली आहे. तर तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगतात चेक तयार करण्याचे काम बाकी आहे. दोन दिवसात अनुदान जमा न केल्यास समस्त गावकरी तहसील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –