नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश

सुनील केदार

वर्धा – वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय संयम आणि शिस्तीचे पालन करत कोरोना रुग्ण वाढीचा दर जिल्ह्यात आटोक्यात ठेवला होता. मात्र आता जिल्ह्यातील परिस्थिती बदलली असून नागरिकांनी नियम न पाळल्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यापुढे मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न  पाळणे आणि दुकानात किंवा उद्योगाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था न करणे, हॉटस्पॉट मधील बाहेर फिरणारे नागरिक अशा सर्वांवर अतिशय कडक कारवाई सोबतच आस्थापना सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेत.

वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात लॉकडाऊन सोबतच जिल्ह्याच्या सीमा बंद कराव्या लागू शकतात, त्यामुळे नागरिकांनी अशी वेळ आणू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केले.

15 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि रुग्णालयांची व्यवस्था या संदर्भात पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, माजी आमदार अमर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, श्रीगाठे, सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ नितिन गंगणे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

वर्धा शहरात गिताईनगर, स्नेहल नगर, सिंधी मेघे, लक्ष्मीनगर, मसाळा, रामनगर, सावंगी मेघे या ठिकाणी तसेच हिंगणघाटमध्ये गांधी वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, ज्ञानदा स्कूल, देवळीमध्ये  रामनगर, पुलगाव, गांधी चौक पूलगाव, नाचणगाव या ठिकाणी हॉटस्पॉट असून सदर ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे  अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.  सामाजिक कार्यक्रमात खास करून लग्न समारंभाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक आणि मंगल कार्यालयाच्या मालकांवर दंडात्मक कारवाई सोबतच मंगल कार्यालय सील करण्याची कारवाई सुद्धा करावी, त्यासोबतच नागरिकांनी लग्न घरच्या घरी करण्यावर जास्त भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट येत असून नगरपालिका आणि नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन धडकपणे कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.  नागरिकांनी लक्षणे आढळल्यास दुखणे अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाऊन चाचणी करावी आणि रुग्णालयात दाखल होऊन योग्य ते उपचार घ्यावेत असे आवाहनही पालकमंत्र्यांनी बैठकीच्या दरम्यान केले. यावेळी वर्धा शहरात आणि आर्वी हिंगणघाट आष्टी पुलगाव देवळी याठिकाणी हॉकर्स, भाजीविक्रेते यांचे मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात आलेली आहे, त्याबरोबरच मोठे दुकानदार यांच्याही  चाचण्या कराव्यात आणि दुकानदारानी यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात लॉकडाऊन सोबतच जिल्ह्याच्या सीमा बंद कराव्या लागू शकतात, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केले.

यावेळी  जिल्हाधिकारी यांनी यापुढे प्रत्येक आठवड्यात रविवारी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर लग्न आणि इतर सामाजिक कार्यात केवळ  पन्नास लोकांची उपस्थितीस परवानगी, सामाजिक कार्यक्रमासाठी उपस्थितातांना आर. टी. पी. सी.आर चाचणी बंधनकारक आहे त्याचबरोबर जिल्ह्यात वयोवृद्ध नागरिक आणि अति जोखमीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आहे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई सुद्धा करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड 961,आय सी यु बेड 179, व्हेंटिलेटर 68, उपलब्ध आहेत.  पुढे आपल्याला व्हेंटिलेटरची गरज लागू शकते त्यामुळे त्यासाठी आताच आपण मागणी कळवावी असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –