‘या’ जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

farmer

परभणी – अचानक झालेल्या पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे मराठवाड्याचा शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. चार-पाच दिवसांपासून तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी रात्री तालुक्यातील काही भागाला वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिके भूईसपाट झाली आहेत.

शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहर व परिसरामध्ये अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. तर तालुक्यातील आहेरवाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली. ज्वारी, हरभरा ही पिके काढण्यासाठी आली असताना पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे या कामामध्ये व्यत्यय आला. तर शनिवारी रात्री झालेल्या अचानक वादळीवाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडली. झाडे उन्मळून पडल्यामुळे कावलगाव परिसरातील विद्युत पुरवठा रात्री अकरा वाजता खंडित झाला होता. रविवारी दिवसभरात परिश्रम करून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. एकंदरीतच मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबली आहेत. सध्या ज्वारी, गहू काढणे, हळद काढणी ही कामे जोमात सुरू आहेत. अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे या कामांवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. रविवारी तालुक्यात ढगाळ वातावरण होते.

महत्वाच्या बातम्या –