मोठी बातमी – पेट्रोल-डिझेल नंतर राज्यात आता खत ही महागले; खताच्या भावात १०० ते २५० रुपयाची वाढ

खत

हिंगोली – पेट्रोल-डिझेलच्या भावात सतत वाढ होत आहे. या भाववाढीमुळे सामान्य जनतेसह बळीराजा सुद्धा त्रस्त आहे. या समस्येत आणखी भर टाकण्याचा निर्णय खत कंपन्यांनी घेतला आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढल्यामुळे मशागत ही महागली आहे. त्यात आता खताच्या भावात १०० ते २५० रुपयाची वाढ करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतल्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागणार आहे.

खत उत्पादक कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. खताच्या दरात १०० ते २५० रुपयांनी वाढ होणार आहे. रब्बी हंगामातील पिके जवळपास काढणीला आली आहेत. आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागले असून, आतापासूनच शेतीची मशागत करीत आहेत. तसेच खत, बियाण्यांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. मात्र, आता खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

मागील महिनाभरापासून इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. याचा परिणाम खताच्या उत्पादन खर्चावरही होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच खताचे दर वाढले असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बतम्या –