मोठी बातमी – वाढवलेल्या खतांच्या किंमती मोदी सरकारने पुन्हा केल्या कमी

शेतकरी

नवी दिल्ली – शेती संबंधीत कायदे तयार केल्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात आधीच शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांचा जास्त समावेश असला तरी देशातील इतरही शेतकरी या प्रश्नाबाबत साशंक आहेत. त्यातच अचानक खत विक्रेत्या कंपन्यांनी खतांच्या किंमतीत भरघोस वाढ केली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात सरकार विषयी नाराजी पसरली होती. यावर तत्काळ कार्यवाही करत सरकारने खतांच्या किंमती पुन्हा कमी केल्या आहेत. केंद्रीय राज्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.

यंदा राज्यात चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, काही ठिकाणी अवकाळी आणि गारपीटीचे संकट शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरले. त्यात हंगाम तोंडावर असताना अचानक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली. खत विक्री करणाऱ्या कपंन्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. आधीच पेट्रोल, गॅसच्या किंमती वाढल्याने केंद्र सरकारवर टीका होत असतांना, शेतकऱ्यांच्या खताच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

खतांच्या वाढवण्यात आलेल्या किंमती संदर्भात केंद्र सरकार आणि खत विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत खतांच्या किंमती पुन्हा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळणार आहे. मात्र, कंपन्यांसोबत आधीच चर्चा केली असती तर, सरकारला या नाराजीचा सामना करावा लागला नसता.

महत्वाच्या बातम्या –