मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन नाहीच; मात्र उद्यापासून ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार

पुणे – झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुण्यात लॉकडाउन लागू करायचा की नाही, याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध केला. तर प्रशासनाने देखील लॉकडाऊन नको पण निर्बंध अधिक कडक करावेत अशी भूमिका या बैठकीत घेतली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उद्यापासून (३ एप्रिल ) पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.

दरम्यान, गुरवारी ( १ एप्रिल ) पुण्यात ४ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ७३ हजार ४४६ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ०७७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ३२ हजार २६० झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –