मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता

संचारबंदी

औरंगाबाद – शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. बारा दिवसांत सुमारे २२४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बेजबाबदार नागरिक शहराला लॉकडाऊनच्या दरीत तर लोटत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहर लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आले आहे, असे मानले जात आहे. रुग्णसंख्या वाढीवर प्रशासनाचे लक्ष असून, योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून, दोन महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय, महापालिका कार्यालय, आरटीओ कार्यालयात कोरोना चाचणी केली जात आहे.

त्याशिवाय व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये ऑक्सिमीटर व थर्मल गनची सक्ती करण्यात आली आहे. रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध आणि उपाययोजना केले असले, तरीही रुग्णांची संख्या अद्याप नियंत्रणात आलेली नाही. शहरात २३ फेब्रुवारीपासून रोज २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत, त्यात २७ फेब्रुवारी रोजी २९७ रुग्णांची नोंद झाली. बाजारपेठेतील गर्दी, मास्क न वापरणारे नागरिक या बेजबाबदारपणामुळे संसर्ग वाढत असल्याचे मानण्यात येत आहे. या वर्तनाला अटकाव करायचा असेल, तर लॉकडाउनशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा आता वरिष्ठ पातळीवर सुरू झाली आहे.

काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता प्रशासन रुग्ण वाढीवर बारीक लक्ष ठेऊन आहे, असे सांगण्यात आले. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे संकेतही काही अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले होते, त्यांनी देखील रुग्णसंख्या वाढत राहिली, तर लॉकडाउनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –