मोठी बातमी – राज्यात लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता

उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेनं काही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नांदेड, अमरावती, नागपूर, अकोला येथे स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील इतर शहरी भागात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. खासकरुन मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरामध्ये दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईत तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच राज्यात मंगळवारी 28 हजार 699 रुग्ण आढळून आले. तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज दुपारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कदाचित महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये वाढती रुग्ण संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –