शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली

शरद पवार

मुंबई – केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, कृषी कायद्यांबाबत खा. शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘कृषी कायद्यामुळं शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी संसदही अस्वस्थ आहे. त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली तर चुकीचं ठरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे उद्या काय होतेय हे पहावे लागेल असंही ते काल म्हणाले.

दरम्यान, बारामती येथे पत्रकारांनी भाजपच्या साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विचारणा केली असता शरद पवार यांनी त्यांचं नांव न घेता चांगलाच समाचार घेतला.

काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

बेजबाबदारपणे बोलण्याचं काही लोकांचं वैशिष्ट्य असतं. कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत शरद पवार यांनी लगावला.