दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाची चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यानंतर, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांचे नियम धाब्यावर बसवत दिल्लीतील इतर भागात प्रवेश केला. यावेळी त्यांना रोखताना पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची देखील झाली.

आंदोलकांनी बस, पोलीस वाहने यांचे नुकसान करत पोलिसांवरच ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. तर, लाल किला देखील शेतकऱ्यांनी काबीज केला. हे सर्व प्रकरण हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच शेतकरी नेत्यांनी हे आंदोलक आपले नसून शेतकऱ्यांनी मुख्य आंदोलन स्थळी परतावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी पावले उचलले आहेत.

दिल्लीतील अनेक भागातील इंटरनेट सेवा आता बंद करण्यात आली आहे. इंटरनेटवरून आक्षेपार्ह व आपत्तीजनक संदेशाचा वा व्हिडिओचा प्रसार होऊ नये यासाठी खरबदारीची भूमिका घेण्यात आली आहे. सिंघू, तिक्रि, गाजीपूर यासह अन्य भागातील इंटरनेट तसेच टेलिकॉम सेवा देखील बंद करण्याचे आवडेश देण्यात आले आहेत. तर, इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग, मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आली आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –