महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांच राज्य सरकारला पत्र

कोरोना

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी महाराष्ट्राला पत्र पाठवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना दिल्या आहेत. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्रात सुरुवात झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्राच्या सारांशात म्हटलंय की, महाराष्ट्रात कोव्हिड 19च्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे. रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीयेत. ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोव्हिड 19पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत, अशी खंत केंद्र सरकारनं व्यक्त केलीय.

कोव्हिडचा हा प्रसार रोखण्यासाठी वा थांबवण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर 2020 प्रमाणे प्रशासकीय यंत्रणा सक्रीय करण्यात यावी, असा केंद्रीय पथकाचा निष्कर्ष असल्याचं या पत्रात केंद्रानं नमूद केलंय.

यापुढच्या सूचनांमध्ये उल्लेख करण्यात आलेले सगळे महत्त्वाचे भाग आणि त्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना यांचं कठोरपणे पालन करण्यात यावं. सोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि गृह विभागाने कोव्हिड 19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि वेळोवेळी सांगण्यात येणारी मार्गदर्शक तत्वं यांचंही पालन संसर्ग रोखण्यासाठी करण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या –