अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली ७८०० कोटींची मागणी

अतिवृष्टी बाधित शेतकरी

बीड – संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तत्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे. तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील सढळ हाताने आर्थिक मदत जाहिर करावी अशी अपेक्षा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांचा-शहराचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ७ हजार ८०० कोटींची मदत मिळावी, असे पत्र केंद्र सरकारला पाठवलेले आहे. अंतिम मदतीचे दुसरे पत्रही पाठवले जाईल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे नुकसानीची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रगती सभागृहात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, संपूर्ण राज्यभरामध्ये अतिवृष्टीचे संकट आले आहे. पहिल्या टप्प्यात केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. पण त्यांचे पथक मात्र आलेले नाही. सरासरी खरीप पिकांची राज्याने केंद्राकडे नुकसानपाेटी आर्थिक मदतीची मागणी केल्यानंतर केंद्रीय पथक शेतीची रब्बीच्या हंगामात पाहणीसाठी दाखल होतात, अशा स्थितीमध्ये केंद्राची मदतही तुटपुंजी मिळते ही परिस्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या –